Thursday, September 17, 2009

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा
आयुष्य अवघे चुकामूक आहे, मला हे समजले उशीरा उशीरा

मला मागते ती दटावून आता, तिचे चित्र माझ्या खिश्याआतले ते
तिने पाहिले हे तिचे श्रेय नाही, जरा मी लपवले उशीरा उशीरा

जिवा गुंतवू पाहिले मी अवेळी, नको त्या स्थळी अन नको त्या प्रसंगी
तिला सर्व वेळीच लक्ष्यात आले, मला फार कळले उशीरा उशीरा

आता प्राक्तनाचा उजाडेल तारा, किती जागूनी वाट मी पाहताहे
कधी ना कळे नीज लागून गेली, सितारे झळकले उशीरा उशीरा

किती पाहिली स्वप्न मी बेईमानी, आता खेदखंती कराव्या कशाला
मला सत्य आधीच ठाऊक होते, पुरावे गवसले उशीरा उशीरा

गड्या जिंदगी हाय जमलीच नाही, तिला मी - मला ती उमगलीच नाही
जिण्याचा कधी पिळ गेलाच नाही, जरी दोर जळले उशीरा उशीरा

संदिप खरे
नेणिवेची अक्षरे


[written using paahijen.com/scratchpad - simple and fast]

No comments: